मागण्या मान्य न झाल्यास बुधवारपासून बेमुदत संप

सरकारी कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप; बहुतांशी शाळा बंद

नगर  – राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक-शिक्षकेत्तर, आरोग्य अशा विविध 45 संघटनांनी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा विविध संघटनांनी केला आहे. शिक्षकांचा या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. या संपास जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शालेय कामकाज बंद ठेवून प्रतिसाद दिला.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची निदर्शने सन 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बंद पाळला. यावेळी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निर्दशने केली.उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेतील बांधकाम, शिक्षण, आरोग्य, लेखा, लिपीक वर्गीय पंधरा हजार पैकी तेरा हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रमख मागण्या शासनाकडून मान्य न झाल्यास 11 सप्टेंबर पासून राज्य समन्वय समितीच्या धोरणानुसार बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.

मनपा कर्मचाऱ्यांची गेटसभा सातव्या वेतन आयोगासाठी मनपा कर्मचारी युनियनने आज मनपाच्या प्रवेशद्वारासमोर सभा घेतली. युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सचिव आनंद वायकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. महापालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या आदेशानुसार महापालिका कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी विनाअट लागू करण्याच्या मागणीसाठी आज महापालिकेसमोर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचाच सकाळी 11 वाजता गेट सभा घेण्यात आली.राज्य सरकारने विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी लोखंडे यांनी यावेळी केली.

शिक्षकांच्या संपास प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या व जुनी पेन्शन बचाव कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली होती.या संपास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शालेय कामकाज बंद ठेवून प्रतिसाद दिला.जिल्ह्यातील बहुतांश शाळा आज बंद होत्या. या संपाबद्दल जुनी पेन्शन बचाव कृती समिती व राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित,कृती समितीचे संयोजक चंद्रकांत चौगुले,शिक्षक परिषदेचे सखाराम गारूडकर,प्रशांत म्हस्के,एस.एस.बांगर,शरद दळवी आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील 1021 शाळांपैकी 85 शाळातील 1089 शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते,तर प्राथमिक शाळांची अधिकृत आकडेवारी उशिरापर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती. जिल्ह्यातील बारा हजार प्राथमिक शिक्षकांमधील सर्वच शिक्षक संपात सहभागी झाल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.