खरे कोण? बोगस कोण? गुरुमाऊलीच्या मांडवात वर्चस्वाचा संघर्ष

आज ठरणार गुरुजींच्या राजकारणातील खरा बाजीराव सिंघम कोण ?

नगर –
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांत आणखी एक नवीन गटाची भर पडत असून आमचीच संघटना खरी गुरूमाऊली असल्याचा दावा करत रावसाहेब राहोकले गटाने मंगळवारी,दि.10 नगरमध्ये शिक्षक मेळाव्याचे आयोजन केले आहे. बापू तांबे गटाकडे गुरुमाऊलीची अधिकृत कायदेशीर मान्यता असल्याचा दावा तांबे गटाकडून होत आहे,तर रोहोकले गटही आमच्याकडे गुरूमाऊलीची कायदेशीर मान्यता असल्याचा दावा करत आहे.

कायदेशीर गुरुमाऊली कोणाचे हे तांत्रिकदृष्ट्या मागेपुढे सिध्द होईलही पण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची खरी ताकद कुणाच्या मागे आहे,हे उद्याच्या मेळाव्यानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर बोगस असल्याचा जो आरोप करत आहेत,तो लगेच निकाली निघणार नसला तरी गुरुजींच्या राजकारणातील खरा बाजीराव सिंघम कोण हे या मेळाव्याच्या यश-अपयशावर ठरणार हे मात्र निश्‍चित!

सदिच्छा मंडळात पहिल्यांदा फू ट पडून संजय कळमकर यांनी गुरुकुलची स्थापना केली.नंतर पुन्हा सदिच्छात फूट पडून रावसाहेब रोहोकले व बापू तांबे यांनी गुरुमाऊलीचे रोपटे लावले.हे रोपटे अल्पावधीत बहरले.मंडळाच्या स्थापनेलाच बॅंकेची सत्ता ताब्यात आली. रोहोकले यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत त्यांच्या हातात सर्व सुत्रे देण्यात आली.पण येथेच घोळ झाला.तांबे व त्यांचे पहिल्या दिवसापासूनच पटले नाही. त्यात रोहोकले यांच्यावर मनमानी व हुकूमशाहीचा आरोप तांबे गट व विरोधी संघटना करू लागल्या. रोहोकले निवृत्त झाल्यावर दोनच दिवसात बॅकेच्या पदाधिकारी निवडीत तांबे गटाने रोहोकले गटाला धोबीपिछाड देत सत्ता मिळविली अन तांबे-रोहोकले गटातील छुपा संघर्ष उघड झाला.

तांबे यांच्याकडे गुरुमाऊलीची कायदेशीर मान्यता असल्याचा दावा होवू लागला,त्यामुळे रोहोकले नव्या संघटनेची स्थापना करणार अशी चर्चा सुरु झाली.मात्र रोहोकले समर्थकांनी नव्या संघटनेचा दावा खोडून काढत आम्हीच खरे गुरूमाऊलीचे शिलेदार आहोत असा दावा केला आहे. आमच्याकडेही गुरुमाऊलीची कायदेशीर मान्यता आहे. अन सर्वात महत्वाचे आमच्याकडे रावसाहेब रोहोकलेंसारखे सर्वसामान्य शिक्षकांच्या मनातील नेतृत्व आहे,त्यामुळे उद्याच्या मेळाव्यातील ताकदच खरे गुरूमाऊली सिध्द करेल असे रोहोकले समर्थकांना वाटते.

नव्या संघटनेचा अट्टाहास कशासाठी?
रावसाहेब रोहोकले यांच्यासोबत पारनेर तालुक्‍यासह जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षक 18 ते 20 वर्ष खांद्याला खांदा देवून शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी लढत होते. शिक्षक संघ व गुरूमाऊली मंडळाने त्यांना भरभरून दिले असतानाही त्यांनी नवा संधटनेचा घाट का घातला आहे? गुरूमाऊली मंडळ सर्वसामान्य शिक्षकांचे आहे.त्यात पडणारी फू ट माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाला वेदना देणारी आहे.या घटनेने अत्यंत क्‍लेश होत आहे. परंतु शिक्षकांमध्ये लोकप्रिय असलेल्या गुरूमाऊली मंडळाचा माझ्यासारखा सर्वसामान्य कोणताही कार्यकर्ता रोहोकले यांच्या सोबत जाणार नसल्याचा दावा गुरुमाऊलीचे पारनेर तालुक्‍याचे अध्यक्ष बाळासाहेब सालके यांनी स्पष्ट केले.

रोहकले गटाचा आज शिक्षक मेळावा
राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी,दि.10 सकाळी 11 वाजता ओम गार्डन येथे रावसाहेब रोहाकले गटाचा शिक्षक मेळावा होत आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी रोहोकले गटाने केली असून जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार शिक्षक या मेळाव्यास उपस्थित असतील,असा दावा शिक्षक सघाचे जिल्हाध्यक्ष संजय शेळके,विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे,प्रविण ठुबे,विकास डावखर आदींनी केला आहे. तीन वर्ष रोहोकले यांनी जो पारदर्शक,विकासभिमुख,भ्रष्टाचारमुक्‍त कारभार केला त्याचे प्रतिबिंब उद्याच्या मेळाव्यात दिसेल,असा दावा शेळके व शिंदे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.