मोहसीन संदे
नडशी भागातील शेतकऱ्यांच्या प्रयोगशील उपक्रमाला यश
कोपर्डेहवेली – सद्यस्थितीत कमी कालावधीत हमखास फायदा देणारे नगदी पीक म्हणून अल्पभूधारक शेतकरी वर्गातून आले, हळद पिकास सर्वाधिक पसंती दिली जाते. परंतु गेल्या चार ते पाच महिन्यात सततच्या पावसाने शेतात पाणी साचून आले पिकात कंदकुज तसेच पानावर करपा झाल्यामुळे आले पिकाचे उत्पन्न घटणार असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.
एकीकडे आले पिकातून शेतकऱ्यांना नुकसान होत असताना दुसरीकडे लागवडीनंतर पस्तीस दिवसात उत्पादन सुरू होणाऱ्या चायनीज झुकीनी या भाजीने मात्र प्रयोगशील शेतकऱ्यांना अच्छे दिन दाखवले आहेत. पुणे, मुंबईस्थित पंचतारांकित हॉटेलमध्ये चायनीज झुकीनी या भाजीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सततच्या पावसामुळे काही बागांचे नुकसान झाले तर काही बागांमध्ये उत्पादन मर्यादा संपल्यामुळे बाजारात झुकीनीच्या दरात तेजी असून ज्या शेतकऱ्यांचे उत्पादन सुरू आहे त्यांना पुणे-मुंबई बाजारात मालाच्या प्रतिनुसार सरासरी शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलो असा दर मिळत असून तीस गुंठे क्षेत्रातून दिवसाकाठी सरासरी तीनशे किलो उत्पन्न निघत आहे.
पंधरा दिवसांच्या हंगामात मजुरी व इतर खर्च वजा जाता एकूण दोन महिन्यांच्या पिकात जवळपास ऐंशी हजार रुपये नफा होणार असल्याने झुकीनी उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात लागवड करून शेतकरी गट होणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. शिवाय स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना झुकीनी उपलब्ध होईल.