चाळण झालेल्या घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी

उरुळी कांचन – शिंदवणे परिसरात रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डा का रस्ता, रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे पडले आहेत. याबाबतचे वृत्त प्रभातने प्रसिद्ध केल्यावर या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, दुरूस्ती करावे, अशा सूचना शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांनी तातडीने केल्याने रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.

उरुळी कांचन – जेजुरी राज्य मार्गावर शिंदवणे घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे व वाहून गेलेल्या साईडपट्टयामुळे आणखीच भर पडली आहे. अडीच किलोमीटर अंतराच्या घाट रस्त्यात घाट उतरताना सुरुवातीला व माळाचे वळण या दोन्ही ठिकाणी मोठी अपघाती वळणे आहेत. याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेकदा निवेदने दिली होती. मात्र, अपघात झाल्यानंतर संबंधित यंत्रणा तात्पुरती डागडुजी करून कायमस्वरूपी उपाययोजनेकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

शिंदवणे हा घाट हवेली व पुरंदर, दौंड या तीन तालुक्‍यांना जोडणारा महत्वाचा घाट आहे. 2015-16 मधील अर्थसंकल्पामध्ये वेल्हे-पाबळ या 130 किमी मार्गाच्या दुरुस्तीसाठी 60 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील उरुळी कांचन ते जेजुरी हा 30 किलोमीटर अंतराची अवस्था पाहून वापर झालेल्या निधीबाबत शंका निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाकडून होणारी डागडुजी तुटपुंजी व निकृष्ट दर्जाची असून स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्‍त केले.

अपघातानंतर प्रशासन जागे होणार का?
पुरंदर तालुक्‍यातील उत्तर बाजूच्या अनेक गावातून उरुळी कांचन व हडपसर येथे दररोज ये – जा करणाऱ्या नागरिक, विद्यार्थी व शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. घाटातील अवघड वळणे, तुटलेले कठडे, वाहून गेलेल्या साईडपट्या, घाट रस्त्यावरील तुटके दिशादर्शक फलक, रिफ्लेक्‍टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत की काय, असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.

शिंदवणे घाटातील रस्ता दुरूस्तीच्या आमदारांकडून तातडीने सूचना

मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात हवेली आणि शिरुर तालुक्‍यात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ज्या रस्त्याची कामे अपूर्ण आहे. त्याचे काम लवकर करण्यात येईल. ज्या रस्त्याचे भूमीपूजन झाले आहे. त्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. कोरेगाव मूळ येथील रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
– ऍड. अशोक पवार, आमदार, शिरूर- हवेली.

Leave A Reply

Your email address will not be published.