पुणे – शेअर कमी किंमतीत खरेदी करुन देण्याच्या आमिषाने आयसीआयसीआय बॅंकेच्या कंत्राटी व्यवस्थापकाने ग्राहकाची 27 लाख 46 हजार 774 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक सूर्यकांत कदम असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत चेतन बळीराम इतापे (रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. मे 2021 ते ऑक्टोबर 2022 दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम हा आयसीआयसीआय बॅंकेत कंत्राटी व्यवस्थापक होता. तर, त्याच बॅंकेत इतापे यांचे खाते आहे.
बॅंकेचे शेअर कमी किंमतीत खरेदी करुन देतो, असे आमिष कदमने इतापे यांना दाखविले. शेअर खरेदीसाठी कदमने इतापे यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने 27 लाख 46 हजार रुपये घेतले. त्यानंतर कदमने शेअर खरेदीच्या बनावट नोंदी केल्याचा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक किरण वराळ तपास करत आहेत.