नॉटिंगहॅम – विश्वचषक स्पर्धेच्या कुंभमेळाव्यामध्ये आज वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आजच्या सामन्यामध्ये वेस्टइंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. आपल्या कर्णधाराचा निर्णय बरोबर ठरवताना कॅरिबियन गोलंदाजांनी सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाला चांगलेच दणके दिले. वेस्टइंडियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था ७९ धावांवर ५ गडी बाद अशी दयनीय झाली होती. मात्र त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी यांनी संघासाठी ६८ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रसेलच्या गोलंदाजीवर होपच्या हातात झेल देत कॅरी तंबूत परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा संकटात सापडेल अशी चिन्ह होती परंतु कॅरीनंतर फलंदाजीस उतरलेल्या कॉल्टर-नाईलने तडाखेबंद फलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्वबाद २८८ धावांचे आव्हान उभारता आले.
वेस्टइंडीजकडून थॉमस, कॉटट्रेल आणि रसेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले तर ब्रेथवेटने ऑस्टेलियाच्या ३ गड्यांना तंबूचा रास्ता दाखवला. कर्णधार जेसन होल्डरने १ गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियन संघाने धावफलकावर २८८ एवढी धावसंख्या उभारली असल्याने आता वेस्टइंडीजला विजयासाठी २८९ धावा कराव्या लागणार आहेत.
तत्पूर्वी आपल्या सलामीच्या सामन्यांमध्ये वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघानी मोठा विजया मिळवला असून वेस्टइंडीजने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ७ विकेट राखून मात दिली होती. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला ७ विकेट्सने नमवत विजयी सलामी दिली होती.