वेलिंग्टन – महिला विश्वकरंडक स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर 5 गडी राखून विजय मिळवित अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच हा सामनाही जिंकत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना 50 ऐवजी 43 षटकांचा झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 43 षटकांत 6 बाद 135 धावांपर्यतच मजल मारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 33 षटकांत 5 गडी गमावत निर्धारित लक्ष्य सहज पूर्ण केले.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून एकाही फलंदाजांला मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. तळातील खेळाडू लता मंडळने 33 धावा, तर सलमा खातूनने नाबाद 15 धावांची खेळी करत संघाला 135 धावांपर्यत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
निर्धारित आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची कर्णधार बेथ मूनीने चिवट झुंज दिली. इतर फलंदाज अपयशी असताना तिने 75 चेंडूंमध्ये नाबाद 66 धावा फटकावल्या. तसेच ऍनाबेल सदरलॅंडने शेवटच्या षटकात नाबाद राहात 26 धावांची खेळी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाने 32.1 षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केला.