नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मान यांनी राज्यासाठी एक लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज मिळावे, अशी विनंती पंतप्रधानांकडे केली.
मागील सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यावर कर्जाचा बोजा आहे. तो दूर करण्यासाठी राज्याला तत्काळ मदत म्हणून 1 हजार कोटी रुपयांची गरज आहे. केंद्राने दोन वर्षे अशी मदत करावी. त्यानंतर राज्याला स्वत:च्या बळावर वाटचाल करणे सोपे होऊ शकेल, असे मान यांनी सांगितले.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडला. पंजाबची सीमा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बळकट करण्याची विनंतीदेखील मान यांनी याप्रसंगी केली. या दिशेने पंजाब केंद्राला सर्वतोपरी मदत करेल, अशी हमी मान यांनी दिली. पंजाबने नव्या जोमाने प्रगतीच्या वाटेवरून मार्गक्रमण केल्यास त्याचा देशाच्या विकासालाही हातभार लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.