पैठण (औरंगाबाद) – यंदाचा नाथषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. आज काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. नाथमंदीरात भानुदास एकनाथच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या खणखनणाटात षष्ठी महोत्सवाची काला दहिहंडी नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते फोडण्यात आली. काल्याचा प्रसाद घेऊन वारकरी तृप्त मनाने परतीच्या मार्गावर चालते झाले.
सायंकाळच्या सुमारास मानाची नाथवंशजांची काला दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली, पालखी ओटा मार्गे वाळवंटातून दिंडी नाथमंदिरात नेण्यात आली. यावेळी मंदिरात भाविकांनी रिंगण करून पाउल्या खेळल्या, महिला भाविकांनी फुगड्या खेळून सेवा अर्पीत केली. भानुदास एकनाथाच्या गजरात वारकरी व भाविकांसह खेळलेल्या पावल्यामुळे मंदिरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी हजारो महिला भाविकांनी सजवलेल्या कलशातून दहीहंडीचा प्रसाद करून आणला होता. दहिहंडी फुटताच मंदिरात भाविकांनी एकमेकांना काल्याचा प्रसाद वाटला. नाथषष्ठी महोत्सवासाठी पैठण नगरीत गेल्या तीन दिवसा पासून मुक्कामी असलेल्या विविध फडावरील दिंडीप्रमुखांनी आप आपल्या फडावर काल्याचे किर्तन करून दुपारीच पैठण नगरिचा निरोप घेतला. वारकऱ्यांना निरोप देताना पैठणकरांना भरून आले.