अहमदाबाद – विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-20 क्रमवारीत प्रगती केली असून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरन फिंच दुसऱ्या क्रमांकावर तर, लोकेश राहुल पहिल्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानी कायम आहे. टी-20 गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशीद खान पहिल्या क्रमांकावर आहे.