नवी दिल्ली – जागतिक अर्थव्यवस्था सुधारू लागली असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. त्यातच भारतीय रुपयाचे मूल्य वधारले आहे. या काळात कारणामुळे भारतीय सराफात शुक्रवारी सोन्याच्या दरात घट झाली. त्याचबरोबर चांदीचे दर कोसळले.
शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 291 रुपयांनी कमी होऊन 44,059 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर चांदीचा दर तब्बल 1,096 रुपयांनी कमी होऊन 65,958 रुपये प्रति किलो झाला.
सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य 20 पैशांनी वाढले होते.
रुपयाचे मूल्य वाढल्यानंतर सोन्याची आयात स्वस्त होते. या घटनाक्रमाबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तप्पल पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत असल्यामुळे त्या प्रमाणात भारतात सोन्याचे दर कमी होत आहेत.
कारण भारत आपल्या गरजेचे बहुतांश सोने आयात करतो. भारतात आठ महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते, आता त्यामध्ये घट होऊन सोन्याचे दर 44 हजार रुपयापर्यंत कमी झाले आहेत.
त्यामुळे दागीने आणि लग्नकार्यासाठी सोने घेणाऱ्यांना सध्याची वेळ योग्य आहे, असे दिसून येते. सोन्याचे दर 50 हजार रुपयापेक्षा कमी असल्यानंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खरेदी फायदेशीर ठरू शकते असे बऱ्याच विश्लेषकांचे मत आहे.