नवी दिल्ली – लैंगिक शोषणाचा आरोप असलेले कुस्ती महासंघाचे ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याच्या मागणीवरून पैलवानांचे काल दिवसभरातील नाट्य चांगलेच चर्चेत राहिले. मात्र, त्यामुळे जराही विचलित न झालेल्या ब्रिजभूषण यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पैलवानांनी त्यांना मिळालेली पदके गंगा नदीत सोडून दिल्यामुळे मला फाशी होणार नाही. त्यांनी माझ्यावर आरोप केले त्याच दिवशी मी त्यांना केव्हा झाले, कुठे झाले आणि कोणावर झाले हे प्रश्न विचारले होते.
माझ्या विरोधातील एक जरी आरोप सिद्ध झाला तर मी स्वत: फाशी घेईल. चार महिने झाले, सरकार मला फाशी देत नाहीये त्यामुळे हे आता आपलेच मेडल घेऊन गंगा नदीत सोडायला निघाले आहेत, अशी टीका ब्रिजभूषण यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, पैलवानांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे द्यावेत. न्यायालयात सादर करावेत. न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली तर ती भोगायला मी तयार आहे. हा त्यांचा केवळ इमोशनल ड्रामा सुरू आहे. आपला मुद्दा मांडताना आणि आंदोलक कुस्तीगिरांना लक्ष्य करताना ब्रिजभूषण यांनी शायरही केली.
ते म्हणाले, बाढ कैसे आती है, आपभी जानते है, तैरना कैसे है हम भी जानते है. आपल्या पित्याने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी जे वनवासात निघून गेले त्या प्रभू रामाला आम्ही आदर्श मानतो. माझ्यावरचा एकजरी आरोप सिद्ध झाला तर मी स्वत: फाशी घेण्यास तयार आहे.
आरोप करणाऱ्या खेळाडूंच्या यशात माझ्या कष्टांचाही वाटा आहे. त्याकरता मीही घाम गाळला आहे. मी त्यांना कोणता शाप देणार नाही. मात्र, ऑलिपिंकमध्ये भारताला सात पदके मिळाली. यातील पाच माझ्या कार्यकाळातील आहेत. काही दिवसांपूर्वी पर्यंत हे लोक मला कुस्तीचा देव मानत होते आणि आता आरोप करत आहेत.
माझ्यासोबत जाट, मुस्लीम, ब्राह्मण आणि तेली असे सगळेच उभे आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडून मला पाठिंबा मिळतो आहे असा दावा त्यांनी केला.
कुस्ती महासंघातील पदावर एका विशिष्ट समुदायातील व्यक्तीची वर्णी लागावी याकरता हा सगळा प्रकार सुरू झाला असल्याची कुजबुज आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण यांनी हे विधान केल्याचे मानले जाते आहे.