मुंबई – पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 या परिसरात 73 नंबरच्या एका व्यावसायिकाच्या घरामध्ये शरद पवार व अजित पवार यांची, शनिवारी (ता.१२ ऑगस्ट) भेट झाली. या भेटीनंतर बाहेर पडताना अजित पवार गाडीत झोपून गेले.
ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर पवार काका – पुतण्यांमधील या भेटीबाबत विविध चर्चा रंगल्या. पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरु आहेत याबाबतचे विविध तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली.
दादांनी गुप्त पद्धतीने काकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आता या बैठकीला राजकीय रंग देऊ नका असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं. ते कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, “मी बैठकीला गेला हे मान्य करतो. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच..’ असे अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘शरद पवार आपले काका असल्याने त्यांना भेटण्यात काहीही गैर नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यात चोरडिया यांची घरी भेट झाली, चोरडिया यांच्याशी आमचे दोन दशकांचे कौटुंबिक संबंध असल्याचं तसेच ते शरद पवार यांचे वर्गमित्र असल्याचं अजित पवार म्हणाले.
ही भेट गुप्त असल्याच्या चर्चा नाकारताना अजित पवार यांनी, दिवाळी व दसऱ्यालाही शरद पवार यांना भेटणार असल्याचे सांगितले. यामागे कोणतेही राजकीय डावपेच नाहीत, भेटीला वेगळं वळण देऊ नका असं अजित पवार म्हणाले.