मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची काल म्हणजेच, 23 जानेवारी रोजी 97 वी जयंती होती. या निमित्ताने विधान भवनातील सेंट्रल हॉल येथे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हजेरी लावली होती.
दरम्यान, यावेळी बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. “आज मी राजकीय पक्ष काढू शकलो तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच’ अशा भावना राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, “मी खरं सांगतो लहानपणापासून मी त्यांच्या सहवासात राहिलो म्हणून मी त्यांच्या ज्या गोष्टी पाहू शकलो त्यामुळेच मी स्वतःचा एक राजकीय पक्ष काढू शकलो नाहीतर माझी हिम्मत झाली नसती. त्यामुळं यश आलं तरी हुरळून जात नाही, पराभव झाला तरी खचून जात नाही’ असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी लहानपणापासून अनेक गोष्टी बघितल्या. पराभव झालेले लोक बाळासाहेब ठाकरेंकडं यायचे तेव्हा त्यांना सांभाळणारे बाळासाहेब तर दुसरीकडे निवडून येणाऱ्या लोकांशी बोलणारे बाळासाहेब.. तेव्हा त्यांच्याशी कशा पद्धतीनं बाळासाहेब बोलायचे हे सगळं मी लहानपणापासून पाहत आलो आहेत आणि मी त्यातूनच शिकत गेलो..” अशी भावना यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली.