Baba Balaknath: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला. यानंतर आता तिन्हीही राज्यातील मुख्यमंत्रीपदावरून चर्चा रंगली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत बाबा बालकनाथ यांचे नाव समोर येत आहे. राजस्थानमध्ये बाबा बालकनाथ यांना योगी आदित्यनाथ म्हणून ओळखले जाते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या नाथ संप्रदायाचे आहेत, त्याच नाथ संप्रदायाचे साधू बाबा बालकनाथ आहेत. यातच त्यांच्या नावाची मुख्यमंत्रपदासाठी चर्चा सुरू झाल्यानंतर बाबा बालकनाथ यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
बाबा बालकनाथ यांनी शेअर केलेल्या ट्वीटद्वारे (एक्स) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत दिले आहेत.”पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच खासदार आणि आमदार होऊन देशसेवा करण्याची संधी जनतेने दिली. निवडणूक निकाल आल्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजूनही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचा आहे”, असे ट्विट (एक्स) करत बाबा बालकनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाच्या चर्चांना पूर्णविराम दिला असल्याचे म्हंटले जात आहे.
पार्टी व प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में जनता-जनार्धन ने पहली बार सांसद व विधायक बना कर राष्ट्रसेवा का अवसर दिया।चुनाव परिणाम आने के बाद से मीडिया व सोशल मीडिया पर चल रही चर्चाओं को नज़र अंदाज़ करें।मुझे अभी प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में अनुभव प्राप्त करना है।
— Yogi Balaknath (@MahantBalaknath) December 9, 2023
बाबा बालकनाथ राजकीय कारकीर्द
- बाबा बालकनाथ 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर अलवर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
- 2023 विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने तिजारा मतदारसंघातून तिकीट दिले होते. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांचा पराभव करून विजय मिळवला आहे.
- या विजयानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव चर्चेत आहे.
मुख्यमंत्री पदासाठी कोणाची नवे चर्चेत
राजस्थानमध्येही मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सस्पेंस आहे. बाबा बालकनाथ यांच्यासह दिया कुमारी यांचेही नाव चर्चेत आहे. याशिवाय, वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कारण त्या राजस्थान भाजपचा मोठा चेहरा आहेत. तसेच, वसुंधरा राजे राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत आहे.