Aditya Thackeray : देशातील मागील महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यानुसार पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने विजय मिळवला. यात राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. मात्र या निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मध्य प्रदेशच्या पांढुर्णा दौऱ्यावर असताना, ४ राज्यात काँग्रेसचं सरकार येणार असल्याचं विधान केले होते. सध्या त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे.
भाजप आमदार राम सातपुते यांनी आदित्य ठाकरेंचा तो जुना व्हिडिओ शेअर केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी, व्यासपीठावर काँग्रेस नेते कलमनाथ देखील उपस्थित होते. यावेळी, भाषण करताना आदित्य ठाकरेंनी ५ राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत भाष्य केलं होतं.
चार राज्यांत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसला केवळ एका राज्यात बहुमत मिळालं आहे. तर, भाजपाने तीन राज्यात सत्ता मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळेच, भाजपा आमदार राम सातपुते यांनी आदित्य ठाकरेंचा तो जुना व्हिडिओ शेअर केला आहे.
. @AUThackeray Enjoy Victory of @BJP4India in 3 states . pic.twitter.com/wV15Dvbnip
— Ram Satpute (@RamVSatpute) December 5, 2023
काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे व्हिडिओमध्ये?
आमदार राम सातपुते यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत, आदित्य ठाकरे मध्य प्रदेशातील कार्यक्रमात भाषण करत आहेत. त्यावेळी, “लिहून घ्या, चार राज्यांत काँग्रेसंच सरकार येणार, मी मध्य प्रदेशमध्ये कलमनाथ यांच्या शपथविधीची तारीख आणि वेळ विचारायला आलो आहे,” असे म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओसह सातपुते यांनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला आहे. हा व्हिडिओ शेअर करत राम सातपुते यांनी भाजपच्या 3 राज्यातील विजय एन्जॉय करा… असं कॅप्शन दिलं आहे. सध्या आदित्य ठाकरे यांची या व्हिडिओवरून भाजप समर्थकांकडून खिल्ली उडवली जात आहे.