“मी सांगतो, या टीव्हीवाल्यांना माझा शाप लागेल”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी माध्यमांविषयी व्यक्त केला संताप

नवी दिल्ली : देशात  करोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील दोन-तीन महिन्यात पूर्णपणे धुमाकूळ घातला होता. मात्र सध्या ही लाट आता ओसरताना दिसत आहे. दरम्यान, करोनाची सर्वाधिक माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम माध्यमांनी केले आहे. मात्र या माध्यमांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री नाराज असल्याचे समोर आले आहे. कारण त्यांनी ही नाराजी एका कार्यक्रमातून उघड केली आहे.

माध्यमं करोनाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे  वातावरण आहे, असा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला आहे. त्याचबरोबर आपण केवळ Paracetamol आणि अँटिबायोटिक औषधं खाऊन बरे झालो असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

चंद्रशेखर राव यांना याच वर्षी एप्रिलमध्ये करोनाची लागण झाली होती. त्यांनी असा दावा केला आहे की केवळ दोन औषधांच्या सेवनाने ते आठवड्याभरात करोनातून बरे झाले. बारंगल इथल्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “माहित नाही कोण काळी बुरशी, पिवळी बुरशी अशा आजारांबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. कुठली वाहिनी आहे की कोणता पेपर आहे माहित नाही. ही बुरशी जिवंत आहे की निर्जीव पण लोक या गोष्टी ऐकून मरत आहेत. मी सांगतो, या टीव्हीवाल्यांना शाप लागेल.”

आपल्याला करोनाची लागण झाली होती त्यावेळचा अनुभव सांगताना राव म्हणाले की, त्यांना डॉक्टरांनी फक्त दोन गोळ्या दिल्या होत्या आणि ते आठवड्याभरात बरे झाले. राव म्हणाले, माध्यमं लोकांना घाबरवत आहेत. अशा प्रकारे विनाकारण भीती पसरवण्याची काय गरज?

पुढे बोलताना ते म्हणाले, “माध्यमं खरी परिस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. करोना नसतानाही सरकारी रुग्णालयांमध्ये जागा मिळत होती का? डॉक्टर कधीच रुग्णांना उपचार नाकारत नाहीत. कारण त्यांना माहित आहे की गरीब फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार घेऊ शकतात. त्यामुळे ते रुग्णांना जमिनीवरच बसवतात आणि त्यांचे उपचार करतात. मात्र ही माध्यमं काय करतात, फोटो काढतात आणि सांगतात की रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये जमिनीवर झोपायला लागतं.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.