सांगोला – प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी नेहमीच विरोधकांकडून केली जाते. अशात राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे यांनी गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये, आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दराडेने दिला होता. यावर आता गौतमीने प्रत्युत्तर देत संताप व्यक्त केला आहे.
‘मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?’, असा सवाल गौतमी पाटीलने केला आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधताना प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले घनश्याम दराडे?
गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये, आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दराडेने दिला होता. त्यानंतर ते म्हणाले होते की, “छत्रपती शिवाजी महाराज हे बाई वाचवणारे होते नाचवणारे नव्हते हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. छोटा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो की, वाकडेतिकडे चाळे करून तुम्ही डान्स केला तर येणाऱ्या पिढीवर काय संस्कार होतील? नव्या पिढीला वाटेल की असे वाकडेतिकडे चाळे करून डान्स केला तर फार फेमस होतं. त्यामुळे नवी पिढी त्याकडे आकर्षित होईल आणि त्याप्रमाणे ते वागतील.”