मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा घनिष्ट मित्र व भारताचा एकेकाळचा सर्वात शैलीदार डावखुरा फलंदाज विनोद कांबळी अचानक माध्यमांसमोर आला व चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. सचिनच्या तोडीस तोड किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त गुणवत्ता असलेला विनोद आपल्याच काही चुकीच्या निर्णयांमुळे मागे पडला व भारतासह जागतिक क्रिकेटसाठीही विस्मृतीत गेला. आता तो कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी चक्क काम शोधत असून कोणी काम देता का काम, अशी याचना करत आहे.
कांबळी क्रिकेट प्रशिक्षक किंवा याच खेळाशी जोडले जाण्याचे काम शोधत आहे. सध्या त्याचा चरितार्थ केवळ बीसीसीआयकडून मिळत असलेल्या निवृत्ती वेतनावरच चालत आहे. त्याच्याकडे सध्या हेच एकमेव उत्पनाचे साधन आहे. त्याची आर्थिक स्थिती बिकट बनली असून वयाची नुकतीच पन्नाशी गाठल्यावरही तो मुंबई क्रिकेट संघटनेकडे काम मागत आहे.
तीन वर्षांपूर्वी त्याने मुंबई टी-20 लीगमध्ये एका संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते, त्यानंतर आता त्याला कामही मिळेनासे झाले आहे. तसेच 2020 साली करोनाच्या धोक्यामुळे त्याला घरीच बसावे लागले. त्यामुळे बीसीसीआयकडून मिळत असलेल्या अवघ्या 30 हजार रुपये निवृत्ती वेतनावरच त्याला घर चालवावे लागत आहे.
सचिनकडून सारखी अपेक्षा नको
लहानपणापासूनचा मित्र असला तरीही सचिनला सारखी मदत मागणे योग्य नाही. त्याला तर माझी सध्याची स्थिती माहीत आहे. त्यानेच मला त्याच्या अकादमीत काम दिले होते. आता पुन्हा त्याच्याकडे मदत मागणे अयोग्य आहे. तो माझ्या पाठीशी कायमच उभा असतो; परंतु आता मला माझ्या हिमतीवर काहीतरी मिळवायचे आहे. प्रशिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, असे कांबळीने म्हटले आहे.
नेरुळ येथील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादामीत तो युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करत होता. हे काम त्याला सचिननेच दिले होते. मात्र, रोज पहाटे 5 वाजता उठून डी. वाय. पाटील स्टेडियमवर जावे लागत होते. तसेच तो संध्याकाळी बीकेसीमध्येही प्रसिक्षक म्हणून कार्यरत होता. आता ही दोन्ही कामे त्याच्या हातून गेली असल्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली आहे. त्याने मुंबई क्रिकेट संघटनेकडेही मदत मागितली आहे. वानखेडे स्टेडियम तसेच बीकेसीमध्ये संधी मिळाली तर आपण उपलब्ध असल्याचे त्याने संघटनेला कळवले आहे.