कानपूर – स्पायडरमॅन हा चित्रपटात एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये एका क्षणात पोहोचतो. धावत असताना तो इमारतीवर चढतो. त्याला कोणी पकडू शकत नाही…. अशाच काही गोष्टी कानपूरच्या डॉ.वीरेंद्र स्वरूप शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सुरू होत्या. त्यानंतरच विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या मजल्यावरून 16 फूट खाली उडी मारण्याची पैज लागली.
दरम्यान, तिथे उभा असलेला इयत्ता 3री चा विद्यार्थी विराट याने “मी स्पायडरमॅन आहे’ म्हणत चक्क शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. बालकाला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना 19 जुलैला घडली असून त्याचे सीसीटीव्ही शुक्रवारी समोर आले आहे.
घटना कानपूरच्या किडवाई नगर एच-2 ब्लॉकमध्ये असलेल्या डॉ. वीरेंद्र स्वरूप एज्युकेशन सेंटरची आहे. येथील बाबुपुरवा कॉलनीतील रहिवासी आनंद बाजपेयी यांचा 8 वर्षांचा मुलगा विराट हा वर्ग 3री मध्ये शिकतो. आनंद यांचे मेडिकल स्टोअर आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार 19 जुलै रोजी त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. त्यावेळी दुपारी दीडच्या सुमारास तो शाळेच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली. शाळा व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार मुलांमध्ये स्पायडरमॅनबद्दल चर्चा चालू होती. दरम्यान, विराटने उडी घेतली, असे सांगितले आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
ही संपूर्ण घटना शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. विद्यार्थी विराट एकटाच रेलिंगच्या दिशेने आला आणि त्याने रेलिंगवर उडी मारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मुलाच्या अज्ञानामुळे हा अपघात झाला असून आपण याप्रकरणी तक्रार करणार नसल्याचे विद्यार्थ्याच्या आईने आता सांगितले आहे.
“विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणात शाळा व्यवस्थापनावर कोणताही आरोप केलेला नाही. मुलाच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे विद्यार्थ्याच्या आईचे म्हणणे आहे,’ असे किडवई नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रदीप सिंह यांनी सांगितले आहे.