मुंबई – ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याची एनसीबीकडून शुक्रवारी कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्याचा मित्र पॉल ग्रियाडला अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून ड्रग्स कनेक्शन समोर आल्याने बॉलीवूडमधील अनेक जण एनसीबीच्या रडारवर आहेत.
यातच जवळपास ७ तासाच्या चौकशीनंतर वृत्त माध्यमांशी बोलतांना अर्जुनने ड्रग्जप्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान एनसीबीने अर्जुनचा जवळचा मित्र पॉल ग्रियाड याला अटक केली आहे. एनसीबीने पॉलची गुरुवारी चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक केली आहे. त्यांची आणखी चौकशी केली जाणार आहे.
पॉल हा एक ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट आणि मुंबई येथे राहणारा व्यापारी आहे. पॉल हा अर्जुन रामपालचा जवळचा मित्र आहे. अर्जुनच्या गर्लफ्रेंडचा भाऊ ऍगिसिलास डीमेट्रिएड्स याच्याशी पॉलचा व्यावसायिक व्यवहार होता. एनसीबीने दावा केला आहे की, पॉल ऍजिसिलोसकडून बंदी असलेली औषधं खरेदी करीत होता. या प्रकरणात अटक करण्यात येणारा पॉल हा दुसरा परदेशी नागरिक आहे.
एनसीबीने अर्जुन रामपालला गुरुवारी समन्स बजाविले होते. यानंतर अर्जुन रामपाल हा आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर झाला. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बॉलीवूडमधील ड्रग्स सेवनाबाबत त्याची चौकशी केली.
काही दिवसांपूर्वी एनसीबीने अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स हिची देखील सलग दोन दिवस चौकशी केली.
दरम्यान, अर्जुन रामपाल याच्या घरावर छापा टाकण्याच्या आदल्या दिवशी चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्या सध्या जामीनावर सुटलेल्या आहेत.