बैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही : राज ठाकरे

पुणे – माझ्या भूमिका स्पष्ट असतात. बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही अशा प्रखर शब्दात राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने भाजप-मनसेची युती होणार अशी चर्चा होती. यासंदर्भात माहिती देताना राज ठाकरे यांनी भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे.

पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलताना म्हणाला की, मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसले तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव. माल नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

मनसेने परप्रांतियांबाबतची भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करू असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. याविषयी ठाकरे यांची भूमिका विचारण्यात आली. तेव्हा भूमिका क्लिअर काय करायच्या. माझ्या भूमिका क्लिअर आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत. बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. तसा विचार करत नाही मी. माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजेत. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.