‘त्यांना’ अशा अवस्थेत मी पाहूच शकत नाही

दापोडीतील दुर्घटना : शहीद विशाल जाधव यांच्या पत्नीने अंत्यदर्शनच घेतले नाही

पिंपरी – नाही… त्यांना मी अशा अवस्थेत पाहूच शकणार नाही…या शब्दांमध्ये विशाल जाधव यांच्या पत्नीने अंत्यदर्शन घेण्यास नकार दिला आणि सर्वांचे डोळे पुन्हा एकदा पाणवले.

दापोडी येथे एका खड्ड्यात गाडल्या गेलेल्या कामगाराला वाचविण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव यांनाही प्राण गमावावे लागले. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे. दुसऱ्या दिवशी अग्निशामक विभागाच्या मुख्यालयात जाधव यांचा मृतदेह मानवंदना देण्यासाठी आणण्यात आला होता. यावेळी तिथे उपस्थित जाधव यांची पत्नी, आई आणि चिमुकल्या मुलीला पाहून उपस्थितांना अश्रूंना आवर घालणे अशक्‍य झाले होते. कायम हसतमुख असणाऱ्या विशाल जाधव यांच्या मृत्यूमुळे पत्नीला प्रचंड मानसिक धक्‍का बसला आहे. यामुळे पती विशाल यांचे अंत्यदर्शन घेण्यास पत्नी प्रियंका यांनी नकार दिला. “त्यांना’ अशा अवस्थेत मी पाहूच शकणार नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या अश्रूंना वाट करून दिली.

रविवारी दापोडी येथे ड्रेनेजसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी खाली उतरलेल्या जवानांच्या अंगावर देखील मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव यांचा मृत्यू झाला. हे कळाल्यापासून जाधव यांच्या पत्नी प्रियंका रुग्णालयात होत्या. दुसऱ्या दिवशी अग्निशामक दलाने विशाल यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी देखील प्रियंका या मोटारीत बसून होत्या. त्यांनी पतीचे अंत्यदर्शन घ्यावे, यासाठी नातेवाईकांसह अनेकांनी प्रयत्न केली. मात्र प्रियंका यांनी अंत्यदर्शन घेण्यास नकार दिला. कायम हसतमुख असणाऱ्या पतीला आपण अशा अवस्थेत बघूच शकणार नाही. त्या म्हणाल्या, जाधव यांची कामाला जाण्याची आणि येण्याची वेळच नव्हती. दिवसरात्र नुसते कामच करत होत, त्यांचा अखेरही कामातच झाला.

तुम्ही सगळे आहात, माझा विशाल कुठय?
अखेरची मानवंदना देण्यासाठी विशाल यांचा मृतदेह अग्निशामक मुख्यालयात येण्यापूर्वी त्यांचे नातेवाईक अगोदरच आले होते. त्यावेळी मोटारीतून खाली उतरताच विशालचे मित्र आईला पाहून पुढे आले. सर्वजण काहीच बोलू शकत नव्हते. फक्‍त डोळ्यातील अश्रूच बोलत होते. “काल विशाल तुमच्या सोबतच होता ना, तुम्ही सर्वजण येथे आहात, मग माझा विशाल कुठय, असा प्रश्‍न अग्निशामक मुख्यालयात मानवंदनेसाठी आलेल्या विशाल यांच्या आईने इतर जवानांना विचारला. त्यावेळी जवानांनाही आपले अश्रू आवरता आले नाही. तसेच विशाल यांच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेतानाही आईन पुन्हा एक हंबरडा फोडला.

चिमुकलीची वडिलांकडे झेप
विशाल यांना एक वर्षाची मुलगी आहे. चारच दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस धुमधडाक्‍यात साजरा केला. विशाल यांचे पार्थिव अग्निशामक मुख्यालयात आणल्यावर त्यांची मुलगी नातेवाईकांकडे होती. त्यांनी मुलीला हे बघ तुझे पप्पा, असे म्हणत पार्थिव दाखविले. पप्पांना बघताच त्या चिमुकलीने त्यांच्याकडे झेप घेतली. एरव्ही झेप घेणाऱ्या छकुलीला प्रेमाने उचलून घेणारे हात आज मात्र पुढे आलेच नाहीत. तरीदेखील ती आपल्या पप्पांकडे जाण्याचा प्रयत्न करीत होती. अखेर तिला पप्पांपासून लांब नेण्यात आले. तरीही पप्पांभोवती असलेल्या गर्दीतून पप्पांना शोधण्याचा ती प्रयत्न करीत होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)