रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन ठेकेदार गायब

पोलीस वसाहतीतील प्रकार; नागरिकांचा आरोप
सातारा – तब्बल वीस वर्षांनी दुरुस्तीचा मुहूर्त लागलेल्या पोलीस वसाहतीतील रस्त्याचे काम अर्धवट ठेवून ठेकेदार चार दिवसांपासून गायब असल्याने गोळीबार मैदान परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जुलै महिन्यात सुरू झालेले काम डिसेंबर उजाडूनही पूर्ण झालेले नाही. एक किलोमीटरचा रस्ता करून ठेकेदाराने पाठ फिरवल्याने बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

गोळीबार मैदानातून पोलीस वसाहतीकडे जाणारा रस्ता 1992 साली झाला होता. त्यानंतर एखाददुसऱ्या वेळी किरकोळ दुरुस्ती वगळता हा रस्ता कायमच दुर्लक्षित राहिल्याने येथीलल नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत. याबाबत दैनिक “प्रभात”ने एक वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बांधकाम विभागाने जुलै महिन्यात खडी टाकली. त्यानंतर पावसाचे कारण पुढे करून तीन महिने कामाला प्रारंभ न केल्याने “प्रभात’ने पुन्हा “पाऊस उघडला, बांधकाम विभागाचे डोळे कधी उघडणार’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर 12 नोव्हेंबरला या कामाला सुरुवात करण्यात आली.

सुमारे चार किमी लांबीच्या रस्त्यापैकी जगदंब कॉलनी ते गोळीबार मैदान या केवळ एक किमी अंतरातील काम करून ठेकेदार गेले चार दिवस गायब असून यंत्रसामग्रीही हलविण्यात आली आहे. त्यातच जो रस्ता झाला आहे, त्यावरही डांबर टाकलेले नाही. त्यामुळे लहान खडीवरून दुचाकी वाहने घसरण्याची शक्‍यता असल्याने बांधकाम विभागाने ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत. कामाचा दर्जा राखण्याची सक्‍त ताकीद द्यावी, अशी मागणी होत आहे.

या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल शंका आहे. रस्ता लवकर खराब झाल्यास नागरिकांचे हाल होतील. अपघातांचे प्रमाण वाढेल. गुणवत्ता नियंत्रकाकडून तपासणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहोत.
कल्पना मानवी

नागरिक, पोलीस वसाहत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.