भंडारा – जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो.’ या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रचारावेळी ते म्हणाले,”मी एवढय़ा वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही.’’ असं आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्ह्ड्यातील झाला आहे.
दरम्यान, देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात पटोले यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले असून यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे
मात्र या व्हायरल व्हिडिओवर नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की,’सभेत काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे नाना पटोले यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे.