पुणे : माझी पत्नी पुण्याची. माझा मेव्हणा आजही धनकवडीत राहतो. मी विद्यार्थी परिषदेत कार्यरत असल्यापासून माझे पुण्याशी नाते जोडलेले आहे, त्यामुळे कोणी परका नसून पुण्याचाच आहे, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.
भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, त्याला काही प्रमाणात विरोध होत आहे. दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे, अशी फलकबाजी करण्यात आली. या प्रचाराला पाटील यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्टद्वारे उत्तर दिले. मी पुण्याचा, मी महाराष्ट्राचा, मी अवघ्या देशाचा आहे, असे पाटील यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पोस्ट केलेल्या साडेतीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये पुणेकरांना मतदान करण्याचे आवहन केलं आहे. पुणेकरांचे आणि माझे खूप जुने आणि घनिष्ठ नाते आहे. माझी पत्नी पुण्याची आहे. शिवाय मी पुण्यात विद्यार्थी परिषदेत कार्यरत होतो. त्यामुळे मी पुण्याच्या बाहेरचा नाही. मी तुमच्यापैकीच एक आहे.
स्थअनिक नगरसेवक मुरलीधर मोहोळ आणि विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होण्याची गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याला काय उत्तर मिळते हे पाहणे रंजक ठरणार आहे.