एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली राबविणार – पोलीस आयुक्त
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हैद्राबादच्या धर्तीवर शहरात एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) राबविणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई यांनी दिली. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात साडेतीन हजार सीसीटिव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांचा उपयोग गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी होणार आहे. त्यासोबतच वाहतुकीचे नियोजन करण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. वाहतूक नियमनासाठी आयटीएमएस प्रणाली उपयुक्त ठरत आहे. याबाबत बोलताना आयुक्त म्हणाले, वाहन खरेदी करताना आरटीओकडे वाहनाच्या नोंदणीसोबतच वाहन मालकाचा क्रमांकही घेतला जातो.
आयटीएमएस ही प्रणाली राबविल्यास एखाद्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यास त्यास मोबाईलवर त्वरीत मेसेज जाणार आहे. यामुळे वाहतुकीला शिस्त लागणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा सध्या हैद्राबादमध्ये राबविण्यात येत आहे. आयटीएमएस प्रणाली राबविण्यासाठी अंदाजे तीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आयटीएमएस या प्रणालीचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात येत आहे.