पुणे – 11 गावांमधील मिळकतकराची 75 टक्‍के वसुली

पुणे – महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांमधील सुमारे 75 टक्‍के मिळकतकर वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही गावे महापालिकेत आल्यानंतर पालिकेकडून सुमारे 46 कोटी 59 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील सुमारे 35 कोटी 5 लाख 29 हजार 560 रुपयांची वसुली महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

ऑक्‍टोबर 2017 मध्ये महापालिका हद्दीजवळील 11 गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांमधील रेकॉर्ड महापालिका प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्यानंतर महापालिकेने या रेकॉर्डची तपासणी करून तसेच मिळकतींच्या संगणकावर नोंदी करून ग्रामपंचायतीकडून वाटप करण्यात आलेल्या बिलांची वसुली करण्यात येत होती. आतापर्यंत प्रशासनाने सुमारे 35 कोटी 5 लाख 29 हजार रुपयांची वसुली केल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून सांगण्यात आले. तसेच, उर्वरीत वसुलीबाबतही पालिकेकडून नोटीसा बजाविण्यात आल्या असून या नागरिकांना कर भरण्याच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ही वसुलीही लवकरच केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यंदापासून नवीन बिले
ग्रामपंचायतींनी दिलेल्या बिलांचीच वसूली अद्याप महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असून या गावांमधील नागरिकांना महापालिकेकडून 2019-20 या आर्थिक वर्षाची बिले पाठविण्यात आली आहेत. तसेच, पहिल्या वर्षी 20 टक्‍के दराने ही बिले पाठविण्यात आली असून पुढील पाच वर्षांत टप्प्या टप्प्याने 100 टक्‍के बिले आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तर अद्यापही अनेक मिळकतधारकांकडून महापालिकेने कर आकारणीसाठी बजाविण्यात आलेल्या नोटीसला उत्तर देण्यात येत नसल्याने या गावांमधील सर्व मिळकतींना बिले आकारण्यात अडचण येत असल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.