प्रेरणादायी आणि कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. नवदाम्पत्य एकाच वेळी क्लास वन अधिकारी झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा परीक्षा हे दोघेही एकाच वेळी उत्तीर्ण झाले आहे. सुरेश आणि मेघना अशी या दोघांची नावे आहे. त्यांच्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नोकरी, घर, नवीन संसार हे सर्व सांभाळून त्यांनी अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आहे.
सुरेश आणि मेघना गेल्यावर्षी (2022) लग्नबेडीत अडकले होते. लग्नानंतर अवघ्या एका वर्षातच त्यांना गोड बातमी मिळाली आहे. मेघना यांचे मुळगाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव आहे. तर सुरेशचे गाव हे सिन्नर तालुक्यातील सायाळ आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानापासून त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली होती. अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. दरम्यान त्यांचं लग्न झालं. मात्र लग्नानंतरही कोणत्याही गोष्टीचा त्यांनी अभ्यासावर परिणाम न होऊ देता अभ्यास सुरु ठेवला. दरम्यान, अखेर त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.
स्पर्धा परीक्षेत अनेकजण अपयशाला कंटाळून जातात. भरती निघणाऱ्या जागा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांची संख्या यांच्यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे सर्वांना यश मिळत नाही. परिणामी प्लॅन बी म्हणून अनेकजण दुसरा व्यवसाय, नोकरी शोधतात. पण जे गांभीर्याने अभ्यास करतात त्यांनाच यश प्राप्त होते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुरेश आणि मेघनाचे हे यश प्रेरणादायी आहे. पती-पत्नी एकाचवेळी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.