मुंबई – सुपरस्टार शाहरुख खानच्या “पठाण” ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई सुरू ठेवली आहे , गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात 429 कोटी रुपयांची कमाई केली आहे, असे या चित्रपटाचे निर्माता असलेल्या यशराज प्रॉडक्शनने म्हटले आहे. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट मोठा गल्ला गोळा करीत आहे.
पठाणने चौथ्या दिवशी आणखी 100 कोटींपेक्षा अधिक कमावले, त्यातील भारतातातील कमाई 53.25 कोटी रुपयांची कमाई होती. या चित्रपटाच्या भारतीय भाषांतील डब चित्रपटाची कमाई लक्षात घेतली तर भारतातील आजची एकूण कमाई 64 कोटी रुपये झाली. चौथ्या दिवशी परदेशातील कमाई रु. 52 कोटी आहे, त्यामुळे रिलीजच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाचे संकलन रु. 116 कोटी इतके होते.
सलमान खानच्या “एक था टायगर” (2012) आणि “टायगर जिंदा है” (2017), हृतिक रोशन ची भूमिका असलेला “वार” (2019) नंतर निर्माता आदित्य चोप्राच्या गुप्तचर विश्वातील महत्त्वाकांक्षी चित्रपटांमध्ये “पठाण” हा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 21 पेक्षा जास्त रेकॉर्ड मोडले आहेत.