लाहोर – बेकायदेशीर अवयव प्रत्यारोपणासाठी चीनमध्ये मानवी तस्करी करणारे एक रॅकेट पाकिस्तानमध्ये उघड करण्यात आले आहे. गरीब आणि गरजू लोकांची चीनमध्ये वाहतूक करणाऱ्या 7 संशयितांना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानातील ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ने काल या संशयितांना अटक केली. त्यामध्ये या रॅकेटचा म्होरक्या अब्दुल लतिफ याचाही समावेश आहे. या सर्वांना लाहोरच्या पासपोर्ट कार्यालयात अटक करण्यात आली.
यापूर्वी ‘एफआयए’बेकायदेशीर अवयव प्रत्यार्पणामध्ये गुंतलेल्या काही संशयितांना पंजाब प्रांतात अटक केली होती. आखाती देशांमधील लोक मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी पंजाबमध्ये मोठ्या संख्येने येत असतात.
यासाठी गरजवंतांना वापरून घेतले जात असून चीनमध्ये अवयव प्रत्यारोपण घडवून आणणारी टोळी लाहोरमध्ये सक्रिय असल्याचे गोपनीय वृत्त होते. त्यानुसार पासपोर्ट कार्यालयावर छापा घालून अवयव दाते आणि एजंटांसह 7 संशयितांना अटक केली गेली आहे, असे ‘एफआयए’चे पंजाबचे उपसंचालक सरदार मावार्हान खान यांनी सांगितले.