करोना रोखण्यासाठी 111 पथके सज्ज ः प्रांतअधिकारी सारंग कोडोलकर यांची माहिती
मंचर (पुणे)-मंचर शहरात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तालुका आंबेगाव यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 9) एका दिवशी सर्वेक्षण मोहीम करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांतअधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच्या निर्देशानुसार मंचर शहरात बुधवारी 111 पथके प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करणार आहेत. संशयित रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट एकूण 6 सेंटर ठिकाणी होणार आहे. त्यासाठी 11 पर्यवेक्षक, 6 टेस्टिंग टीम, 30 टेस्टिंग स्टाफ, 12 पोलीस, 3 ऍम्ब्युलन्स, अतिरिक्त 20 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 25 स्वयंसेवक यांची मदत घेतली जाणार आहे. खासगी लॅब यांचे सहकार्य मिळणार आहे.
मंचर शहरातील सर्व नागरिकांनी पथकाला खरी माहिती द्यावी. 100 टक्के व्यक्तींनी घरी थांबावे. सर्वेक्षण पथकाच्या सूचनेवरुन तात्काळ सांगितलेल्या स्वॅब कलेक्शन ऍन्ड सेंटर ठिकाणी टेस्टिंग करून घ्यावे. पुढील अहवाल प्राप्त होताच सूचनेनुसार सीसीसी/ डीसीएचसीमध्ये दाखल करण्यात येईल. सदर सर्वेक्षण मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे.