पुणे- सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हीशिल्ड’ या करोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला पुण्यात सुरुवात झाली आहे. पहिली लस भारती विद्यापीठ रुग्णालयातील दोघांना टोचण्यात आली. आता केईएम रुग्णालयाच्या वढू येथील रिसर्च सेंटरमध्ये आणखी दोघांना ही लस टोचण्यात आली असून, दोन दिवसांत तिघांना लस टोचण्यात येणार आहे.
या दोन रुग्णालयांसोबतच पुण्यातील आणखी केंद्रांवर या लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात होणार आहे. याबाबत प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. आशीष बावडेकर म्हणाले, ‘पहिल्या दिवशी पाच जणांना लस देण्याचे नियोजन होते. मात्र, पाचपैकी तिघांच्या अँटिबॉडी तपासण्यात आल्या. मात्र, निकषांनुसार त्या योग्य नसल्याने उर्वरित दोघांना आम्ही गुरुवारी लस दिली. उर्वरित तिघांना शुक्रवारी लस देणार आहोत.’
शहरात दीडशे ते दोनशे स्वयंसेवकांची निवड केली जाणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात लसीची सुरक्षितता तपासली जाणार आहे. या टप्प्यात पुण्यातील चार केंद्रावरून सुमारे 100 स्वयंसेवकांची चाचणी केली जाईल.
त्यात प्रत्येक केंद्राला 25 ते 30 एवढ्या व्यक्तींची चाचणी करता येईल. सुरक्षेबरोबर अँटिबॉडी तयार होते की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. आता गुरुवारी डोस दिलेल्या दोघांना 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे.’