नवी दिल्ली: लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त हाल हे मजुरांचे होत आहेत. हातावर पोट असणारे हे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी पायीच आपले गाव जवळ करत आहेत. या काळात अनेक भीषण चित्रं पाहायला मिळत आहेत. आग्रा येथील एका राज्यमार्गावर एक प्रवाशी महिला आपल्या चिमुरड्याला सुटकेसवर ठेवून ओढत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या सुटकेसवर चिमुरडा झोपलेला या व्हिडीओत दिसत आहे.या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पंजाब आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. आयोगाने म्हटले आहे की, सध्याच्या या परिस्थितीबाबत सर्वांना माहीत आहेच आणि लॉकडाऊनमध्ये येणाऱ्या अडचणींना केंद्र आणि राज्य सरकार गंभीरपणे सामोरे जात आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट आहे की त्या मुलाच्या आणि त्याच्या परिवाराच्या दु:खाला आणि त्रासाला स्थानिक अधिकारी वगळता रस्त्यावरील अनेक लोकांनी पाहिले.
आयोगाने म्हटले आहे की, जर स्थानीय अधिकारी सतर्क असते तर त्या त्रासलेल्या परिवाराला आणि अशा परिस्थितीचा सामना करणाऱ्या अनेक लोकांना तात्काळ मदत पोहोचवली गेली असती. ही घटना मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या घटनेसारखी आहे. त्यामुळे या प्रकरणात एनएचआरसीच्या हस्तक्षेपाची गरज आहे. एनएचआरसीने म्हटले आहे की, त्यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना आणि आग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी करुन चार आठवड्यांच्या आत विस्तृत रिपोर्ट मागितला आहे.