राष्ट्रवादी काँग्रेसच्या महारक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘निश्चय गरजवंतांच्या आरोग्यसेवेचा, संकल्प ६२०० प्राणांसाठी महारक्तदानाचा’ या ब्रीदवाक्याखाली आयोजन करण्यात आलेल्या या शिबिराचा शुभारंभ वन राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते रविवारी झाला. संदीप बालवडकर, किशोर कांबळे योगेश सुतार, शैलेंद्र कदम, निखिल बालवडकर यांनी या शिबिराचे संयोजन केले.

‘कोरोना परिस्थितीमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास आलेल्या मर्यादा, नागरिकांच्या मनात असलेली भीती, कोरोनासारखी जीवघेणी परिस्थिती या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वाचा आहे.

रक्त ही अशी नैसर्गिक संपत्ती आहे, जी दुसऱ्यांना देत राहिलो, तरी कधी कमी होत नाही. आपण आपले कुटुंब म्हणजे आपली रक्ताची नाती असे म्हणतो. परंतु, रक्तदानाच्या माध्यमातून आपण कितीतरी जणांशी रक्ताचे नाते जोडत असतो. आपल्याशी कुणाचे रक्ताचे नाते जोडले आहे, हे त्या रुग्णालाही माहीत नसते. परंतु, ज्याला रक्तामुळे जीवनदान मिळाले आहे, ती व्यक्ती हे अनोखे नाते आयुष्यभर जपत असते. त्यामुळे, अजितदादांच्या विचारसरणीवर आधारित कृती कार्यक्रमाचा व आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानतो,’ असे प्रतिपादन दत्तामामा भरणे यांनी केले.  याप्रसंगी  १८८३ रक्तसंकलन झाले.

या वेळी दत्तामामा भरणे यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाची पाहणी केली. अद्ययावत कार्यालय उभारल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून, या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वांना अभिमान वाटेल, असे उत्तुंग कार्य घडेल, असा विश्वासही व्यक्त केला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे,  माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, विकास दांगट, बाळासाहेब बोडके, बाबुराव चांदेरे यावेळी  उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या वतीने डॉक्टरांचे पथक रायगडला रवाना
रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ. राजेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे दोन पथक सेवेसाठी रविवारी रायगडला रवाना झाले. या पथकासोबत आवश्यक औषधांचा साठाही पाठविण्यात आला आहे.

एक कुटुंब, एक झाड
वृक्ष लागवड व संवर्धनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य मा. मनोज पाचपुते यांच्या प्रयत्नांतून आणि वनराज्यमंत्री भरणे  यांच्या हस्ते रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.