पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात 45 वर्षे वयावरील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, पुणे शहरात एका दिवसांत 10 हजारांपेक्षा जास्त जणांनी लस घेतली असून, पुणे विभागात एका दिवसांत एकूण 27 हजार 64 जणांनी लस घेतली.
एक एप्रिलपासून चौथ्या टप्प्याचे लसीकरण केंद्राने जाहीर केले. 45 वर्षे वयापुढील अनेक नागरिकांनी एक दिवस आधीच “कोविन ऍप’वर रजिस्ट्रेशन केले होते. याशिवाय “वॉक इन’ आलेल्या नागरिकांनाही महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस देण्यात आली.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, पुणे ग्रामीण आणि एकूणच पुणे जिल्ह्यात चौथ्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एका दिवसांत 27 हजार 64 जणांनी लस घेतली. याशिवाय 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक, हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स, कोमॉर्बिडिटी यांचेही लसीकरण करण्यात आले. याशिवाय ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांनाही ते देण्यात आले. कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लसींचा यामध्ये समावेश होता.पुणे ग्रामीण हद्दीतील 45 वर्षे वयापुढील 9 हजार 257 नागरिकांनी लस घेतली.
पुणे शहरात 10 हजार 220 नागरिकांनी लस घेतली तर पिंपरी-चिंचवड मध्ये 7 हजार 587 नागरिकांनी लस घेतली. तिन्ही विभागात मिळून 405 केंद्रांवर लसीकरण झाले. 42 हजार 850 लस देण्याचे
“टार्गेट’ ठरवण्यात आले होते. 57 हजार 583 जणांना लस देण्यात आली. चौथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी अन्य सर्व टप्प्यांचा समावेश करून 134 टक्के लसीकरण झाले.