एचपी ड्रिम वन महिला प्रिमियर लीग
पुणे – डिव्हाईन स्टार तर्फे आयोजित चौथ्या एचपी ड्रिम वन महिला प्रिमियर लीग (डब्ल्युपीएल)’ अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या गटसाखळी फेरीत पीएमपी ग्रुप आणि एचपी ड्रिम वन या संघांनी सरस धावगतीव्दारे स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
व्हिजन क्रिकेट ऍकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या साखळी फेरीच्या अखेरच्या चरणात पीएमपी ग्रुप संघाने एचपी ड्रिम वन संघाचा 11 धावांनी पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पीएमपी संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्वबाद 120 धावा केल्या. तेजश्री ननावरे (28 धावा), माधुरी आगव (28 धावा) आणि किरण नवगिरे (18 धावा) यांच्या फलंदाजीमुळे पीएमपीने समाधानकारक धावसंख्या उभी केली.
सलग दोन सामन्यात विजय मिळवणाऱ्या एचपी ड्रिम वन संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 20 षटकात 109 धावांवर मर्यादित राहिला. चारमई गवई (35 धावा) आणि सायली लोणकर (31 धावा) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही.
दुसऱ्या सामन्यात प्रियांका घोडके हिने केलेल्या 49 धावांच्या जोरावर ऍडोर मारव्हलस् संघाने ऑक्सिरिच स्मॅशर्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला. ऑक्सिरिच स्मॅशर्स संघाने 20 षटकात 90 धावा केल्या. रोहीणी माने हिने 38 धावा करून संघाला अडचणीतून बाहेर काढले. साक्षी कानडी (18) व वैष्णवी शिंदे (16) यांच्या धावांमुळे संघाला 90 धावा करता आल्या. ऍडोर मारव्हलस् ही धावसंख्या 14.1 षटकात 5 गडी गमावून पूर्ण केली. प्रियांका घोडके हिने 49 धावांची खेळी केली.
साखळी फेरीत ऍडोर मारव्हलस्, एचपी ड्रिम वन आणि पीएमपी ग्रुप यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवले होते. पण सरस धावगतीच्या आधारे एचपी ड्रिम वन आणि पीएमपी ग्रुप संघांनी अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.