नवी दिल्ली – गेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा नोंदणीकृत मतदारांची यादी 6 टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. या संदर्भात, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शुक्रवारी (9 फेब्रुवारी) जाहीर केले की आगामी लोकसभा निवडणुकीत 96.88 कोटी लोकांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे.
आयोगाने सांगितले की, यावर्षी 18 ते 29 वयोगटातील दोन कोटींहून अधिक तरुण मतदार यादीत सामील झाले आहेत. त्याच वेळी, लिंग गुणोत्तर 2023 मध्ये 940 वरून 2024 मध्ये 948 पर्यंत वाढले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आयोगाने मतदार यादी पुर्ननिरीक्षण आणि पारदर्शकतेवर विशेष भर दिला आहे.
मतदार यादीत लिंग गुणोत्तर वाढले –
यावेळी महिला मतदारांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. मतदार यादीतील लिंग गुणोत्तर सकारात्मकरित्या वाढले आहे, जे देशाच्या लोकशाही संरचनेत महिलांच्या वाढत्या भूमिकेचे प्रतिबिंबित करते, आयोगाने म्हटले आहे. मतदार यादीत 2.63 कोटींहून अधिक नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला असून, त्यापैकी सुमारे 1.41 कोटी महिला मतदार आहेत. तर पुरुष मतदारांची संख्या 1.22 कोटी आहे.
यादीतून 1 कोटी 65 लाखांहून अधिक नावे काढून टाकली –
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, यावर्षी 1 कोटी 65 लाख 76 हजार 654 लोकांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. यामध्ये अशा लोकांचा समावेश आहे जे एकतर मरण पावले आहेत किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. याशिवाय डुप्लिकेट मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. यामध्ये 67 लाख 82 हजार 642 मृत मतदार, 75 लाख 11 हजार 128 गैरहजर मतदार आणि 22 लाख 5 हजार 685 डुप्लिकेट मतदारांचा समावेश आहे.
सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या आधी, भारताच्या निवडणूक आयोगाने देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात जम्मू-काश्मीर आणि आसाममधील मतदार याद्यांचाही समावेश आहे.
मतदार यादीत नाव कसं नोंदवायचं?
-मतदार यादीत नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या वेबसाईटवर जा.
-login/register या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
-Don’t have account. Register as a new user या पर्यायावर क्लिक करा.
-एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
-मोबाईल नंबर टाका त्यानंतर कॅप्चा टाका. मग Send OTP या पर्यायावर क्लिक करा.
-मोबाईलवर एक OTP येईल. तो Verifyवर करा.
-पुढे दोन पर्याय दिसतील. I have EPIC Number आणि I don’t have EPIC Number.
– I don’t have EPIC Number या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर नाव, आडनाव, ई-मेल आयडी, पासवर्ड टाका. Register या पर्यायावर क्लिक करा.
– परत एकदा लॉग-इन करा. Registration करताना टाकलेला मोबईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग-इन या पर्यायावर क्लिक करा.
-पुढे एका नवीन पेजवरील पहिल्या fresh inclusion/ enrolment या पर्यायावर क्लिक करा.
-त्यानंतर Citizenshipमध्ये I reside in India, पर्यायावर टिक करा, मग राज्य निवडा.
-त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा, तुमचं गाव किंवा शहर ज्या मतदारसंघात येतं त्याविषयीची माहिती भरा.
– लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ निवडा. त्यानंतर तुमचा पोस्टाचा पत्ता टाका.
-यात राज्य, जिल्हा, घर क्रमांक, रस्त्याचं आणि गावाचं नाव, पोस्ट ऑफिस, पिन कोड ही माहिती टाका.
-त्याखाली Date या पर्यायासमोर तुम्हाला तारीख निवडा. वर सांगितलेल्या पत्त्यावर तुम्ही किती वर्षांपासून राहत आहात, ती तारीख, महिना आणि वर्षं टाका.
-एक address proof जोडा. बँक पासबुक किंवा रेशन कार्ड असा एक पर्याय सिलेक्ट करून त्याचा फोटो अपलोड करा.
– त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून जन्माविषयीची माहिती द्या.
– इथं जन्मतारीख, गावाचं नाव, राज्य आणि जिल्हा निवडा. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डाचा फोटो अपलोड करा.
– Age declaration form हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करून भरा.
-तुमचं नाव, वडील किंवा पतीचं नाव आणि गावाचं नाव टाका.
-मतदारसंघाचं नाव टाकल्यानंतर सही करून ठिकाण आणि तारीख टाका. या भरलेल्या फॉर्मचा फोटो काढून तो Age declaration या पर्यायासमोर अपलोड करा. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
– वैयक्तिक माहिती भरा.
– अपलोड करून नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
– declaration वर ठिकाण आणि तारीख टाकून नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
– preview या पर्यायाअंतर्गत नवीन मतदान कार्डासाठी भरलेला फॉर्म-6 स्क्रीनवर दिसेल. त्याखालील सबमिट बटनावर क्लिक केलं की तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला एक रेफरन्स आयडी दिला जाईल.
– हा आयडी वापरून तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता.
– या वेबसाईटच्या होमपेजवर परत आलात की तुम्हाला तिथं Track application Status हा पर्याय दिसेल.
– त्यावर क्लिक केलं की, रेफरन्स आयडी टाकून Track status या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
– एकदा का फॉर्म सबमिट झाला की त्याची स्थानिक Booth level officer छाननी करतात. त्यानंतर तो Electoral Registration officer (उपजिल्हाधिकारी) यांच्याकडे पाठवला जातो.
– सगळी माहिती आणि कागदपत्रं व्यवस्थित असल्यास तो फॉर्म accept केला जातो आणि जवळपास 2 महिन्यांत तुमच्या पत्त्यावर मतदान कार्ड पाठवलं जातं.