प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर आता नव्या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातून कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याबाबत चर्चा रंगू लागलेली असतानाच पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड या शहरी भागात कोणाची वर्णी लागणार, याबाबतही उत्सुकता लागली आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे मंत्रीपद निश्चित असताना त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणला मंत्रीपद मिळणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
आता, वरिष्ठ पातळीवर कोणाचे किती “राजकीय वजन’ आहे, त्यालाच मंत्रीपद मिळणार, अशीही चर्चा आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मंत्रीपद निश्चित आहे. त्यामुळे खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, पर्वती मतदारसंघातील माधुरी मिसाळ यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधून महेश लांडगे यांची नावे चर्चेत आहेत. खडकवासल्याला अनेकवेळा मंत्रीपदाची संधी हुकली आहे. त्यामुळे यावेळी ही संधी मिळणार का? याबाबत ठोकताळे आखले जात आहेत.
खडकवासला मतदार संघाचे आमदार तापकीर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकनिष्ठ आणि विश्वासू मानले जातात. मतदार संघात भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यात तापकीर यांनी मोठी भूमिका निभावलेली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची चांगली उठबस आहे, तसेच त्यांची प्रतिमाही निष्ठावान नेता अशी आहे. त्यामुळे त्यांची वर्णी मंत्री लागू शकते, अशी चर्चा मतदार संघात आहे. आमदार तापकीर यांच्यासह पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांच्याही नावाची चर्चा आहे.