मुंबई – ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा (Lalit Patil) भाऊ भूषण याला मंगळवारी पुणे पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील बाराबंकी भरतपूर परिसरातून अटक केली. यामुळे आता ललित पाटील देखील लवकर ताब्यात येण्याची शक्यता आहे.
पुण्यातील या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी ललित पाटील आणि बंदरे व खणीकर्ममंत्री दादा भुसे यांच्यातील कनेक्शनसंदर्भात भाष्य केले आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील दादा भुसे यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याचा नाशिकमध्ये कारखाना होता. या कारखान्यातून पोलिसांनी 300 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. हा कारखाना पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणाची चौकशी करणार आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“नाशिकमध्ये ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याच्या ड्रग्ज कारखान्यावर धाड पडली. पालकमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हा कारखाना चालू शकत नाही. या ड्रग्जच्या पैशातून दादा भुसे यांना मोठी आर्थिक मदत मिळाली का? ललित पाटील प्रकरणात दादा भुसे यांचा संबंध काय? ड्रग्ज माफियाकडून दादा भुसे यांना किती खोके दिले? त्याबदल्यात दादा भुसे ड्रग्जच्या कारखान्याला संरक्षण पुरवत होते का?” या प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुढे संजय राऊत म्हणाले की, “मी यासंदर्भात केंद्रीय तपास यंत्रणा, अमली पदार्थ नियंत्रण कक्ष आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहे. राज्यातील एक मंत्री ड्रग्ज रॅकेटमध्ये काम करत आहे, ही गोष्ट गंभीर आहे. यासाठी दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.”
सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?
ललित पाटील प्रकरणात दादा भुसे यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “भुसे यांनी फोन करुन ललित पाटीलला ससूनमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत. काल नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली, तसेच कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील सकाळी सांगितले, की या प्रकरणात शिंदे गटाच्या आमदाराचा हात आहे.
म्हणजेच याची माहिती सर्वांना आहे, पण नाव कोणी घेतले नव्हते. पण मी थेट नाव घेताना सांगते की, या प्रकरणात दादा भुसे यांच्या नावाभोवती संशयाचे धुके असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जाऊ नयेत? त्यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? जर गृहखात्याची खरेच इच्छाशक्ती असेल, की या प्रकरणाचा छडा लावायची तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.