मराठ्यांचं सर्वात आवडीचं हत्यार असं ज्याला संबोधलं जातं , ते म्हणजे दांडपट्टा. याची भेदकता तलवारीहुन जहाल. उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नाही. मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे. पण मराठे यात जास्त कुशल अन तरबेज होते. पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे. खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फिरवू शकतो.
* असा आला ‘पटाईत’ शब्द !
पूर्वी मावळे 16 हात लांब पट्टाही वापरत, याला बेल्टप्रमाणे कंबरेभोवती गुंडाळले जाई. सय्यद बंडाला जिवा महालाने 16 हात लांबून कलम केले होते. छोट्याश्या लिंबाचे दोन तुकडे पट्ट्याने होतात. आपण मराठीत ‘पटाईत’ हा शब्द वापरतो. याचा अर्थ तरबेज. मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना ‘पटाईत’ असे म्हणले जाते. तोच शब्द पुढे आपल्या बोली भाषेत रुढ झाला.
* कोण असायचे ‘धारकरी’?
मराठी हशमांमध्ये एक म्हण होती ‘धारकरी’ म्हणजे जी व्यक्ती तलवार, भाला तीर कमान अथवा अजुन अन्य अशा ४-५ हत्यारांमध्ये तरबेज असली की त्यांना ‘धारकरी’ असे गणले जायचे. यासंदर्भातच अजुन एक म्हण होती की ‘दहा धारकरी तर एक पट्टेकरी’ यावरुनच पटाईताला काय मान असेल हे लक्षात येते.
* कसा असतो दांडपट्टा ?
पट्ट्याची लांबी 5 फूट असते. त्याचे पाते 5 फूट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधारण 1 फुटाचा असतो. त्याचे पाते लवचिक असते. पण लवचिक असले तरी याच्या कौशल्याने केलेल्या वाराने एखादा माणुस अक्षरशः उभा चिरला जावु शकतो. गर्दन देखील कटू शकते. पट्टा चालवणारा जणु काही आपल्या भोवती 10 फुटांचा पोलादी घेर उभा करतो.
* दांडपट्टयाची वैशिष्ट्ये कोणती ?
यात प्रवेश केल्यावर साक्षात मृत्यूच. दोन्ही हातात पट्टा घेणारा पटाईत हा अतिकुशल समजला जातो. याचे कौशल्य अन प्रहार क्षमता साहजिकच दुपट असते. याची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे याचे पाते जरी लवचिक असले तरी पण याची वार करण्याची क्षमता तलवारीपेक्षा जास्त असते. याचे मुख्य कारण म्हणजे आपण तलवार फिरवताना सगळा जोर आपल्या मनगटातून लावत असतो. पण प्रत्यक्षात पट्टा फिरवताना आपला पूर्ण हात, आपला दंड, खांदे या सर्व अवयवातून ताकद लागलेली असते. पाते लवचिक असले तरी जर वार करताना पाते लपकले नाही. अन वार सरळ झाला तर सरळ एक घाव दोन तुकडे होतात.