नवी दिल्ली – जानेवारी ते मार्च या तिमाहीत पुण्यातील घरांचे दर तीन टक्क्यांनी वाढून सर्वसाधारणपणे 7,485 रुपये प्रति वर्ग फूट झाले असल्याची माहिती क्रेडाई या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात देण्यात आली आहे. तसेच आगामी सहा ते नऊ महिन्यांमध्ये देशातील मोठ्या आठ शहरांमध्ये घरांचे दर पाच ते दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
जानेवारी ते मार्चदरम्यान देशातील मोठ्या 8 शहरांमध्ये घरांचे दर सर्वसाधारणपणे 11 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचे असल्याचे क्रेडाईने म्हटले आहे. क्रेडाईने या माहितीचे संकलन कॉलीअरर्स ऍण्ड फोरास या संस्थेच्या सोबत केले आहे. दिल्लीमधील घरांचे दर सर्वात जास्त म्हणजे 11 टक्क्यांनी वाढले आहेत.
हैदराबाद शहरातील घरांचे दर या तिमाहीत नऊ टक्क्यांनी, अहमदाबाद शहरातील घरांचे दर आठ टक्क्यांनी, कोलकत्ता शहरातील घरांचे दर सहा टक्क्यांनी वाढले आहेत. जानेवारी-मार्च या तिमाहीत बंगळुरू, चेन्नई, मुंबई शहरातील घरांचे दर एक टक्क्याने वाढले असल्याचे या माहितीत म्हटले आहे. गेल्या दोन वर्षापासून घरासाठीच्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर घरांची मागणी वाढली असल्यामुळे घरांच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आठ शहरांमध्ये सर्वसाधारणपणे दरवाढ चार टक्के झाली आहे. आगामी सात ते नऊ महिन्यांमध्ये या दरात आणखी पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ज्यांना घरे वापरायची आहेत आशा ग्राहकाकडून घराची खरेदी जास्त प्रमाणामध्ये होत आहे. गुंतवणुकीसाठी घराची खरेदी करण्याकडे कल कमी आहे. आता घरांची इन्व्हेंटरी कमी झाली असून आगामी काळामध्ये घरांच्या योजनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचेही क्रेडाई या संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांनी सांगितले.
महागाई वाढत असल्यामुळे विकसक परेशान असतानाच गेल्या आठवड्यामध्ये घरासाठीच्या काही कच्च्या मालाच्या दरात कपात होईल अशा प्रकारच्या उपाययोजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सिमेंट आणि पोलादासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरील शुल्क कमी केल्यामुळे या उत्पादनांच्या किमती कमी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काही पोलादाच्या किंमती अगोदरच कमी झाल्या आहेत.