पुणे -जिल्ह्यातील ग्रामीण करोना संसर्ग आटोक्यात येत नसून, पंधरा दिवसांपूर्वी कमी झालेली हॉटस्पॉट संख्येत 7 ने वाढ झाली आहे. सध्या 13 तालुक्यांत एकूण 91 हॉटस्पॉट गावे आहेत. त्यामध्ये खेड, जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट संख्या आहे.
ज्या गावात दहापेक्षा जास्त करोना बाधित संख्या आहे, ते गाव हॉटस्पॉट म्हणून जाहीर कले जाते.
दि. 28 एप्रिल रोजी ग्रामीणमधील सर्वाधिक 465 हॉटस्पॉट गावे होती. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागातील बाधित संख्या कमी होत असल्यामुळे दि. 19 मे रोजी ही हॉटस्पॉट संख्या 397 पर्यंत खाली आली. तर, 2 जून रोजी ती संख्या 186 इतकी होती. दि. 9 जून रोजी जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात आठ दिवसात 100 ने हॉटस्पॉट गावांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी हॉटस्पॉट संख्या 86 इतकी होती.
त्यामुळे महिनाभरात ही संख्या आणखीन कमी होईल, या आशेने आरोग्य विभागही निवांत झाले आणि हॉटस्पॉट संख्या कमी होण्याएवजी त्यामध्ये वाढ झाली. मागील बारा दिवसांपूर्वी हॉटस्पॉट गावांची संख्या 84 इतकी होती. आज ही संख्या 91 वर पोहचली आहे. त्यामध्ये त्यामध्ये खेड तालुक्यात 4 ने हॉटस्पॉट गावांची संख्या वाढली आहे. जुन्नरमध्ये आणि पुरंदरमध्येही प्रत्येकी 5 ने वाढ झाली आहे. तर मावळ, हवेली, शिरूर, वेल्हा तालुक्यात हॉटस्पॉट संख्येत घट झाल्याचे दिसून येते.
21 जून रोजीची तालुकानिहाय हॉटस्पॉट गावांची संख्या
बारामती – 9, दौंड – 6, मावळ – 7, हवेली – 9 , खेड – 13, आंबेगाव – 10, जुन्नर – 16, शिरूर – 4, पुरंदर – 10, इंदापूर – 2, मुळशी – 3, भोर -1, वेल्हा – 1.