पुन्हा जामखेड शहरातील ‘हॉटस्पॉट’ १० मे पर्यंत वाढला

एका महिन्यात चार वेळा झाली वाढ

जामखेड: जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण जामखेड शहरात आढळल्याने गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी यांनी जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून ६ मे पर्यंत जाहीर केले होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने याची मुदत चार दिवस वाढवून १० मे पर्यंत या हाॅटस्पाॅट मध्ये वाढ करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात आतापर्यंत १७ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे मागील महिन्यातील १० एप्रिल पासून संपूर्ण जामखेड शहराचा परीसर दोन किलो मीटर अंतरापर्यंत हाॅटस्पाॅट घोषित केला होता. सुरुवातीला हे व्हॉटस्पॉट चार दिवसांसाठी जाहीर केले होते. पुन्हा १४ तारखेला या हाॅटस्पाॅट ची मुदत वाढवून पुढील दहा दिवस म्हणजे २३ एप्रिलपर्यंत वाढवली होती. या दरम्यानच्या काळात १८ एप्रिल रोजी शहरातील एक वृद्धाचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीच्या संपर्कातील दोन मुलांसह एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत जिल्हाधिकारी यांनी १९ एप्रिलला आदेश काढून १ मे पर्यंत हाॅटस्पाॅट जाहीर केले होते. यात पुन्हा आदेश काढून ६ मे पर्यंत हाॅटस्पाॅट जाहीर केले होते. त्यामुळे उद्या पासून काही अत्यावश्यक दुकाने उघडतील थोडी सवलत मिळेल मेडिकल दवाखाने उघडतील अशी आशा होती पण आज पुन्हा आदेश काढून १० मे पर्यंत हाॅटस्पाॅट जाहीर केल्याने नागरिकांना जी आशा होती त्यावर मुदत वाढल्याने विरजण पडले. आता दहा तारखेनंतर अकरा तारखेला तरी काही सवलत मिळते कि नाही याबद्दल नागरिकांच्या मनात शंकाच आहे. कारण एक महिन्यापासून लोकांना हाॅटस्पाॅट मुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

प्रशासन सर्व अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यातही अनेक अडचणी येत आहेत. लोकांना योग्य ती सेवा मिळत नाही. साध्या साध्या वस्तू अव्वाच्या सव्वा किमतीला घ्याव्या लागतात लवकर वस्तू उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या व्हॉटस्पॉट मध्ये बदल करून नागरीकांना थोडी ढील देण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.