कोल्हापूरात 2 जूनपर्यंत हापूस व केशर आंबा महोत्सव

कोल्हापूर- उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व शेती बाजार समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थाचे धनंजय डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन पुणे व शेती उत्पादन समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रध्दानंद सांस्कृतिक हॉल, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे हापूस व केशर आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती बाबासो लाड, उपसभापती सौ. संगिता पाटील, परिवहन अधिकारी पी.डी.सावंत, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, संचालक भगवान काटे, शेखर येडगे, बाबुराव खोत, सहाय्यक सरव्यवस्थापक अनिल पवार, मोहन सालपे व बाजार समितीचे संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या माध्यमातून थेट कोकणातील आंबा उत्पादकांसाठी आंबा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. कृषि पणन मंडळाचे अध्यक्ष व सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख व उपाध्यक्ष, कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संकल्पनेतून चालूवर्षी पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बारामती, इंदापूर, पनवेल, सोलापूर, अकलूज व सांगली इत्यादी शहरांमध्ये पणन मंडळाच्या माध्यमातून आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. कोल्हापूर शहरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर जिल्ह्यातील 20 आंबा उत्पादक शेतकरी आंबा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत.

कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना व केशर आंबा उत्पादकांना रास्त भाव मिळावा व कोल्हापूरकरांना नैसर्गिकरित्या पिकवलेला व अस्सल हापूस व केशर आंबा चाखावयास मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व शेती बाजार समिती कोल्हापूर यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रामुख्याने कोकणातील अस्सल हापुस आंबा व केशर आंबा मध्यस्थांशिवाय थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध व्हावा, आंबा उत्पादकांना सुध्दा योग्य दर मिळावा या अपेक्षेने यापुढे दरवर्षी कोल्हापूर शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक 30 मे ते 2 जून 2019 या कालावधीत आयोजित केलेल्या आंबा महोत्सव कोल्हापुरकरांसाठी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहील. आंबा महोत्सवामध्ये ग्राहकांनी भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व कोकणातील नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अस्सल हापूस व केशर आंब्याची चव चाखावी असे आवाहन कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले व सचिव मोहन सालपे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.