लॉकडाऊननंतर काम वेगाने : दीड कि.मी. बोगदा खोदाई पूर्ण
पुणे – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात उभारण्यात येत असलेल्या पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याच्या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत दीड किलोमीटर लांबीचे बोगदे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हे दोन्ही कॉरिडॉर सुधारणा तथा देखभाल, दुरुस्तीसाठी “बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ (बीओटी) तत्वावर 30 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी शासनाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित केले आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच अंतर आणखी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महामंडळाने हाती घेतला आहे. याचा आढवा घेण्यासाठी मुंबई येथे अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येतात. तर पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा रस्ता सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. तसेच या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळतात. त्यामुळे डोंगरालगतची एक लेन बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील उर्वरित मिसिंग लिंकचे काम महामंडळाने हाती घेतले आहे
लॉकडाऊन काळात मजूर निघून गेल्याने काम धिम्यागतीने सुरू होते. या कामाने आता वेग घेतला आहे. 9 पैकी दीड किलोमीटर बोगदा खोदाई पूर्ण झाली आहे. तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासात सुमारे 25 मिनिटांची बचत होणार आहे.
– संदीप पाटील, उपविभागीय अभियंता, एमएसआरडीसी