नगर (प्रतिनिधी) -शहरातील करोना विषाणूबाधित पहिला रुग्ण आज सकाळी साडेअकरा वाजता बूथ हॉस्पिटलमधून घराकडे रवाना करण्यात आला. करोना विषाणू बाधित रुग्णावर नगरमध्येच यशस्वी उपचार झाल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या मेहनतीवर आणखीनच नगरकरांचा विश्वास दृढ झाला आहे.
जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे आणि नियोजनाची देखील या रुग्णाने तोंड भरुन कौतुक केले. यावेळी हा रुग्ण काहीसा भावूक झाला होता. दुबईवरून नगरमध्ये दाखल झालेल्या रुग्णाची करोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या रुग्णाबरोबर त्याचे कुटुंब देखील होते. परंतु या रुग्णाला करोनाची बाधा झाली असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले होते.
तेव्हापासून त्याच्यावर आरोग्य यंत्रणेमार्फत उपचार होत होते. काल त्याचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने त्याला घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. करोना मुक्त झालेला हा नगर जिल्ह्यातला पहिलाच रुग्ण आहे. नगरमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या हा करोनामुक्त रुग्ण धरून तीन होती.
करोना विषाणू बाधित रुग्णावर नगरमध्येच यशस्वी उपचार झाल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या मेहनतीवर आणखीनच नगरकरांचा विश्वास दृढ झाला आहे. करोना मुक्त रुग्ण झाल्यामुळे नगरकरांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे. यावेळी आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय यांनी टाळ्या वाजून त्याला रवाना केले. रुग्णांनी देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी हात जोडून आभार मानले.