विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन
पुणे – पोलीस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांच्याशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल, याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
पुणे विभागातील करोनाबाबत विभागीय आयुक्त म्हणाले, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येमध्ये पाचने वाढ झाली असून रविवारअखेर एकूण रुग्णसंख्या 64 आहे. पाठवलेले एकूण नमुने 1 हजार 283 होते. त्यापैकी 1 हजार 117 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 92 व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्तपैकी 1 हजार 117 नमुने निगेटिव्ह, 64 नमुने पॉझिटिव्ह आहेत. तसेच 10 नमुने निष्कर्ष न काढण्यायोग्य आहेत. आतापर्यंत 15 रुग्णांना बरे झाल्यामुळे सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 7, 125पैकी 4 हजार 581 प्रवाशांबाबत फॉलोअप सुरू असून, 2 हजार 544 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे. म्हणजेच 2 हजार 544 व्यक्तींचा होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण झालेला असून 4 हजार 581 व्यक्ती अजूनही क्वारंटाइन आहेत.
अन्नधान्य पुरेसे
पुणे शहरात 13 हजार 516 भाजीपाला दुकानांमधून आणि 64 शेतकरी बाजार संयोजकांकडून भाजीपाल्याचे वितरण आहे. सार्वजनिक वितरण सेवांच्या गोदामामध्ये 28 हजार 216मे. टन इतका तर खुल्या बाजारामध्ये 1 लाख 55 हजार 570 मे.टन इतका धान्यसाठा आहे. पुणे शहरामध्ये 18 हजार 479 किराणा दुकानांमधून धान्यवितरण करण्यात येत आहे. अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याने नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
परराज्य किंवा पर जिल्ह्यातील कामगार, मजूर यांनी आहे, तेथेच थांबावे. त्यांच्या निवास, जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचारांचीही सोय करण्यात येईल. त्यामुळे या नागरिकांनी आपल्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये. शासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. पीएमपीच्या 1,588 बसेच्या फेऱ्यांमध्ये एकूण 6 हजार 666 प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त अत्यावश्यक बाबींसाठी फेऱ्या सुरू आहेत.
– डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त.