मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने मंगळवारी घरासाठी दिल्या जाणार्या कर्जावरील व्याजदरात मर्यादित कालावधीसाठी 0.15% ची कपात करून तो 8.3% इतका केला आहे. त्याचबरोबर या कालावधीत प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले असल्याचे बँकेने म्हटले आहे. (Home loan interest rate cut by Bank of India)
मात्र ग्राहकांना या सवलतीचा फायदा फक्त 31 मार्च पर्यंत घेता येईल असे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या क्षेत्रात आघाडीवर असलेली स्टेट बँक आणि एचडीएफसी बँकेचा घरासाठीच्या कर्जावरील किमान व्याजदर 8.4% इतका आहे.
बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, तीस वर्षासाठी जर 8.3% व्याजदराने घरासाठी कर्ज घेतले तर एक लाख रुपयांच्या कर्जावरील हप्ता 715 प्रति महिना इतका कमी असू शकतो. त्याचबरोबर बँक ऑफ इंडियाने छतावरील सोलार पॅनलसाठी सात टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध केले आहे.
या कर्जासाठी ही प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले आहे. या मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध केलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ इंडिया तर्फे करण्यात आले आहे.