नवी दिल्ली – एफआयएच प्रो-हॉकी लीगमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 10-2 असा धुव्वा उडवला. भारताने सलामीच्या सामन्यात लढतीत फ्रान्सवर 5-0 असा विजय मिळवला होता. त्यानंतर आफ्रिकेविरुद्धही भारताने अफलातून आक्रमण केले.
भारताकडून जुगराज सिंगने तीन गोल केले. सामन्याच्या चौथ्या, सहाव्या व 23 व्या मिनिटाला गोल केले. संघाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल केला. त्यानंतर अभिषेकने 12 व्या मिनिटाला गोल केला.
गुरसाहिबजीत सिंगने 24 व 26 व्या मिनिटाला दोन गोल करत संघाची आघाडी वाढवली. त्यांना सुरेख साथ देताना दिलप्रीत सिंगनेही 25 व 57 व्या मिनिटाला गोल केले.
त्यानंतर मनदीप सिंगने 27 व्या मिनिटाला गोल केला व दक्षिण आफ्रिकेचा बचाव कुचकामी ठरवला. दक्षिण आफ्रिकेकडून डॅन बेलने 44 व्या तर, रिचर्ड पॉत्झने 45 व्या मिनिटाला गोल केले. मात्र, त्यानंतर त्यांना एकही गोल करता आला नाही.